40+ Marathi Story: Best Marathi Moral Stories
Marathi story for kids (Marathi goshti)
1] जाणीव
बादशहाच्या गुलामांनी कधीच समुद्राची यात्रा केली नव्हती. त्यामुळे त्यांना कधीच समुद्र कसा असतो? त्याची खोली काय असते? याची माहिती नव्हती. बादशहा समुद्र यात्रा करत असे, मात्र गुलामांना कधीच समुद्रावर नेत नसे. एकदा बादशाहाने गुलामांना समुद्रयात्रा घडविण्याचे ठरविले, त्याप्रमाणे एका गुलामाला त्याने जहाजावर बरोबर घेतले, चहूदिशेला पाणीच पाणी बघून गुलाम भयभीत झाला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला. जहाजावरील लोकांनी त्याला समजावून सांगितले कि घाबरण्याची काहीच गरज नाही. आपण जहाजावर सुरक्षित आहोत. परंतु त्याचा विश्वास बसेना. तो सतत ओरडत राहिला. हे पाहून बादशाहाने नाराज होऊन जहाजाच्या खलाश्यांना सांगितले, कि काहीही करा पण या गुलामाचे ओरडणे बंद करा.
खलाश्यांनी पण त्याचे ओरडणे बंद व्हावे म्हणून प्रयत्न केले, समजावून सांगितले, वेगवेगळी आमिषे दाखविली, पण हा गुलाम काही गप्प बसेना. तेंव्हा जहाजावरील एक वृद्ध खलाशी बादशाहाकडे गेला आणि म्हणाला,"हुजूर! मला परवानगी द्या, मी याला गप्प बसवतो." बादशाहाने परवानगी दिली. त्या वृद्धाच्या सांगण्यावरून त्या गुलामाचे दोन्ही हात व पाय बांधण्यात आले व पायाला दोरी बांधून त्याला जहाजावरून पाण्यात लटकाविण्यात आले. काही क्षण पाण्यात घालायचे आणि दोरीने पुन्हा जहाजावर ओढून घ्यायचे असा प्रकार केला. ५-६ वेळेला गटांगळ्या खावून झाल्यावर त्याला जहाजावर घेतले, वर आल्यावर त्याला मुक्त केले पण तो गुलाम एका कोपऱ्यात जाऊन गप्प बसला. हे पाहून सर्वच चकित झाले. बादशाहाने वृद्ध खलाश्याला विचारले कि आता हा गप्प कसा झाला? खलाशी उत्तरला,"हुजूर! आधी तो समुद्रात बुडण्याचे दुःख काय असते हे जाणून घेत नसता नुसता ओरडत होता. पण त्याला आता बुडणे म्हणजे काय असते या प्रकाराची जाणीव झाली आहे म्हणून तो गप्प आहे.त्याच्या शांततेचे कारण त्याला झालेली दुःखाची जाणीव. त्या मानाने इथे त्याला सुख मिळत आहे ते तो अनुभवत आहे."
तात्पर्य-दुःखानंतर येणाऱ्या सुखाला किंमत असते,कदर केली जाते. दुःख मिळाले नाही, सहन केले नाही तर सुख काय असते हे सांगून सुद्धा समजत नाही.
2] अनुभवाच्या जोरावर यश
एका व्यापा-याने दुस-या प्रांतात जाऊन व्यापार करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या शेजा-यानेही तोच निर्णय घेतला. पहिला व्यापारी म्हणाला, भाई आपण दोघेजण एकत्र जाण्याने अडचण निर्माण होईल एक तर तू पहिल्यांदा जा किंवा मला तरी जाऊ दे. दुस-या व्यापा-याने विचार केला, आपण पहिल्यांदा जाण्यात फायदा आहे, रस्त्याने सरळ गेलो तर बैलांना चारापाणी मिळेल. मनाला वाटेल त्या किंमतीवर सामान विकेन. त्याने पहिल्यांदा जाण्याचा निर्णय घेतला. पहिल्या व्यापा-याला वाटले, या व्यापा-याच्या जाण्याने गाडीवाट चांगली तयार होईल.
याचे बैल कडक गवत खातील व माझ्या बैलांना चांगले मऊ गवत खायला मिळेल. नव्या खोदलेल्या विहीरीचे पाणी प्यायला मिळेल. शिवाय चांगल्या किंमतीवर सौदा करता येईल. दुस-या व्यापा-याच्या माणसांनी पाण्याने भरलेल्या घागरी बरोबर घेतल्या आणि प्रवासाला सुरुवात केली. वाटेत काही भिजून आलेले लोक त्यांना भेटले, त्या लोकांनी व्यापा-याला सांगितले, पुढे पाऊस खूप आहे, पाणी घेऊन जाण्याची गरज नाही. व्यापा-याने त्यांचा सल्ला ऐकला. त्या रात्रीच त्या व्यापा-याचा काफिला लुटला गेला. व्यापारीही मारला गेला.एक महिन्याने पहिला व्यापारी पण प्रवासाला निघाला, तेव्हा दरोडेखोराच्या माणसांनी त्यालाही खोटे बोलून भुलविण्याचा प्रयत्न केला पण पहिला व्यापारी त्यांच्या बोलण्याला भुलला नाही. व्यापा-याच्या माणसांनी दरोडेखोरांची माणसे कशी काय ओळखली असे व्यापा-याला विचारले असता व्यापारी म्हणाला, अरे या दिवसात या भागात पाऊस कसा पडेल हा साधा विचार मी डोक्यात आणला व दरोडेखोरांची माणसे मला कळून आली. व्यापारी पुढे गेला व त्याच्या धंद्यात अशा छोट्याशा गोष्टींमुळे तो यशस्वी झाला.
तात्पर्य : अनुभवाने माणूस यशस्वी होतो.
3] अर्थ
एक पंडित स्वतःला फार मोठा विद्वान समजत असे. त्याच्या मनात विचार आला कि राजाच्या समक्ष राजपुरोहीताशी शास्त्रार्थ केला पाहिजे. मला कोणी हरवू शकत नाही याचा त्याला गर्व झाला होता. राजपुरोहिताला हरविले कि राजाला आपली विद्वत्ता माहित होईल आणि त्याद्वारे राजा आपणास बक्षीस पण देईल असे त्याच्या मनात होते. त्यानुसार ठरवून तो राजदरबारात गेला, त्याने पुरोहिताला शास्त्रार्थ करण्यासाठी आव्हान दिले. राजपुरोहीताने पंडिताला प्रथम प्रश्न विचारण्यास सांगितले, पंडिताने प्रश्न केला,"पाच मी, पाच शी, पाच न मी आणि पाच न शी याचा अर्थ सांगा?" राजपुरोहीताला प्रश्न समजला नाही. त्याने राज्याची प्रतिष्ठा राखण्यासाठी ७ दिवसांची मुदत मागून घेतली.
राजाने मुदत दिली मात्र सात दिवसानंतर मृत्युदंड कबुल असेल तरच. सात दिवसात पुरोहिताने उत्तर शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण बुद्धीने,नशिबाने साथ दिली नाही. मोठमोठ्या विद्वानांना हि या प्रश्नाचे उत्तर विचारून पाहिले पण त्यानाही यातील कुट शोधता आले नाही. राजपुरोहिताने विचाराची दिशा सोडून दिली, आता फक्त मृत्यूचा विचार तो करत होता. मृत्युच्या भीतीने त्याने नगर सोडून दिले, गावाबाहेर चालत राहिला, चालून चालून थकला तेंव्हा एका झोपडीपाशी जावून बसला. योगायोगाने ती झोपडी त्या पंडिताची होती आणि तो आपल्या पत्नीशी बोलत होता. पंडित बायकोला प्रश्नाचे उत्तर सांगत होता,"माझ्या प्रश्नाचे उत्तर न देता आल्याने राजपुरोहित मरणार हे खरे ! अगं ! पंधरा तिथीमध्ये पाच तिथी अशा असतात कि त्यांच्या पुढे 'मी' प्रत्यय लागतो -पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी आणि दशमी तसेच पाच तिथी अशा असतात ज्यामध्ये 'शी' प्रत्यय लागतो-एकादशी,द्वादशी,त्रयोदशी,चतुर्दशी आणि पुर्णमाशी आणि पाच तिथीमध्ये मीही लागत नाही आणि शी हा प्रत्यय लागत नाही-प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी आणि षष्ठी. बघ हे उत्तर राजपुरोहीताला कधीच येणार नाही." हे बाहेरून पुरोहिताने ऐकले आणि दुसऱ्या दिवशी दरबारात उत्तर दिले व स्वत:चा जीव वाचविला. अहंकारी पंडिताला राजाने दंड केला.
तात्पर्य- दुसऱ्याला कधीही कमी लेखू नये कारण आपण या ना त्या प्रकारे त्या अवस्थेत जावू शकतो.
4] आचार्य विनोबा भावे
भूदान चळवळीच्या काळातील ही गोष्ट आहे. या चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे होते. त्यांची पदयात्रा सुरु होती. आपल्या काही शिष्यांसह विनोबाजी मीराजींच्या आश्रमात थांबले होते. अल्पशा विश्रांतीनंतर त्यांची पदयात्रा पुन्हा सुरु झाली. त्यावेळी ते हरिद्वारकडे चालले होते. विनोबाजींची प्रकृती थोडी ठीक नव्हती. त्यांची कंबर आणि पाय दुखत होते. त्यामुळे त्यांना खुर्चीत बसवून नेण्यात येत होते. मध्ये मध्ये खुर्चीतून उतरून पायी चालायचे. तेव्हा एक शिष्य त्यांच्याजवळ येऊन म्हणाला,'' बाबा, मला खूप राग येतो, मी काय करावे'' विनोबाजी म्हणाले,'' मी लहान असताना मलाही खूप राग यायचा, मग माझ्याजवळ मिश्री असायची ती मी तोंडात ठेवायचो, परंतु कधीकधी ती ही नसायची'' मग तुम्ही काय करत होता असे त्या व्यक्तीने विचारले. विनोबाजी म्हणाले,'' मी यावर खूप विचार केला, मग माझ्या मनात एक गोष्ट आली.
जेव्हा आपल्या मनाविरूद्ध एखादी गोष्ट आली जेव्हा आपल्या मनाविरूद्ध गोष्ट घडली तर लगेच नाराज होतो जर तो क्षणच आपण टाळला तर रागावर विजय मिळवू शकतो. आनंद आणि नाराजी यावर आपण तेव्हाच प्रकट करतो तो पहिलाच क्षण आपल्यावर वरचढ ठरू पाहतो. तो क्षण टाळणे कठीण आहे. पण मनन करून तो टाळता येतो. मी यावर खूप मनन केले, यामुळेच जीवनात कितीही मोठी आपत्ती आली तरी मी संयम ढळू दिला नाही.''
तात्पर्य :- विचारपूर्वक उचललेले पाऊल आयुष्याला योग्य दिशा देते.
5] आत्मनियंत्रणाचे महत्व
एक जिज्ञासूवृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्ट शिकण्यास तयार होत असे. त्याने धनुष्यबाण तयार करण्यास ते कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणा-यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इ. प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्याच्यात अहंकार आला, तो आपल्या मित्रांना सांगत असे. या जगात माझ्याइतका प्रतिभावंत अन्य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्यांनी जेव्हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले. तेव्हा त्यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्यावी जी आतापर्यंतच्या कलांमध्ये श्रेष्ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्याच्याकडे गेले. मुलाने विचारले, तुम्ही कोण आहात. बुद्ध म्हणाले,''मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे.'' मुलाने यावर त्यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्हणाले,''जो धनुष्यबाण वापरतो त्याला त्याचा वापर माहित असतो, जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्याला ते काम माहित असते. पण जो ज्ञानी आहे तो स्वत:वर नियंत्रण ठेवतो,'' मुलाने विचारले, ते कसे काय. बुद्ध म्हणाले, '' जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो, अशी व्यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्य तर स्वत:ला नियंत्रणात ठेवण्याचे असते.
तात्पर्य :- ज्यांना स्वत:ला नियंत्रणात ठेवता येते त्याला समभाव ठेवता येतो. हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला आनंदी ठेवतो.
6] आत्मविश्वास
एक व्यावसायिक कर्जात बुडाला होता आणि त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग त्याला सुचत नव्हता. धनको त्याच्या घरी वारंवार चकरा मारीत होते आणि पुरवठादार बिलाच्या रकमेचा तगादा लावून होते. असाच तो एका बगिच्यातील बेंचावर डोके हातांनी धरून बसला होता. या कर्जाच्या सापळ्यातून वाचण्यासाठी काहीतरी चमत्कार घडावा, असे त्याला खूप वाटत होते.अचानक एक वृद्ध त्याच्यासमोर उभा झाला. मला वाटते तू खूप अडचणीत आहेस, मला वाटते मी तुला मदत करू शकतो.वृद्धाने त्याला नाव विचारले आणि एक चेक लिहून त्याच्या हाती दिला. हे पैसे घे. आजपासून बरोबर एका वर्षानंतर मला याच ठिकाणी भेट आणि त्यावेळी ही रक्कम मला परत करशील, असे म्हणून तो वळला आणि वेगाने दिसेनासा झाला.व्यावसायिकाने हातातील चेककडे पाहिले. तो 5 लाख डॉलर्सचा होता. खाली सही होती जॉन डी. रॉकफेलर, जगातील सर्वांत श्रीमंतापैकी एक. या रकमेतून माझे कर्ज चुटकीसरशी संपेल, व्यावसायिक पुटपुटला. परंतु त्याऐवजी व्यावसायिकाने तो चेक न वटविता तसाच ठेवून दिला. आता आपल्याजवळ 5 लाख डॉलर्सची रक्कम केव्हाही तयार आहे, या आत्मविश्वासाने तो कामाला लागला.
नव्या उमेदीने तो कारभार बघू लागला. त्याने आधीच्या करारांना पुन्हा वाटाघाटी करून फायदेशीर करून घेतले आणि पैसे देण्याची मुदतही वाढवून घेतली. काही मोठे करार रद्द केले. काही महिन्यातच, तो कर्जाच्या सापळ्यातून बाहेर आला आणि पुन्हा कमाई करू लागला.बरोबर एका वर्षानंतर तो त्याच बागेत न वटविलेला चेक घेऊन आला. ठरल्याप्रमाणे तो वृद्ध तिथे पुन्हा उपस्थित झाला. व्यावसायिक त्याला त्याचा चेक देणार आणि आपली यशाची गाथा सांगणार तेवढ्यात एक नर्स तिथे धावत धावत आली आणि तिने त्या वृद्धाला घट्ट पकडले. चला, शेवटी तुला पकडलेच, ती ओरडून व्यावसायिकाकडे बघून ती नर्स म्हणाली, ययाने तुम्हाला जास्त त्रास तर नाही ना दिला? हा नेहमी मनोरूग्णालयातून पळून जात असतो आणि लोकांना सांगतो की मी जॉन रॉकफेलर आहे म्हणून तिने त्या वृद्धाला ओढत नेले. व्यावसायिक थक्क होऊन हे सर्व बघत होता. त्याला काहीच कळेनासे झाले. गेले वर्षभर आपल्याजवळ ५ लाख डॉलर्स रक्कम केव्हाही तयार आहे, या थाटात तो करार करीत होता.अचानक त्याच्या लक्षात आले की, त्याचे आयुष्य बदलवून टाकणारी ही किमया खऱ्या किंवा अस्तित्वात नसलेल्या त्या रकमेची नव्हतीच. तो त्याला नव्याने गवसलेला आत्मविश्वास होता. त्यानेच त्याला कर्जाचा डोंगर उपसण्याची शक्ती दिली होती.
तात्पर्य- आत्मविश्वासाने कोणतेही कार्य केल्यास यश हे हमखास मिळते.
7] इंद्र आणि मुनी मार्कंडेय
मुनी मार्कंडेय यांच्या कठोर तपस्येने देवराज इंद्र भयभीत झाला होता. त्याला वाटायचे कि आपल्या सिहांसनावर मुनी अधिकार तर दाखवणार नाहीत. त्यामुळे त्याने मुनींची तपस्या खंडित करायचे ठरवले. एके दिवशी इंद्राने मुनींच्या अनुपस्थितीत आश्रमात भरपूर धन आणून ठेवले. जेंव्हा मुनी आश्रमात परत आले तेंव्हा ते धन पाहून हैराण झाले. आपल्या शिष्यांना मार्कंडेय म्हणाले, " हे धन माझे नाही. त्यामुळे हे धन गरीबात वाटून टाका." हे बघून इंद्राच्या लक्षात आले कि मुनिना धनाचा लोभ नाही. त्यावेळी इंद्र राजाच्या वेशात आश्रमात आला आणि मुनींना म्हणाला,"मुनिवर! माझी एक इच्छा आहे कि मी एक राजा आहे आणि माझ्याकडे भरपूर धन आहे. परंतु संतती नाही. माझी अशी इच्छा आहे, कि आपल्याला दत्तक घेवून बसवावे आणि राजगादीवर बसवून संन्यास घ्यावा." मुनी म्हणाले," राजन एकदा ईश्वराशी नाते जोडल्यावर तो धन आणि सिंहासनाशी कधीही लोभ ठेवत नाही.
मला त्याचा कधीही लोभ नाही, नव्हता आणि नसणार. तेंव्हा तुम्हालाच संन्यास घ्यावयाचा असेल माझ्या शेजारीच तुमच्यासाठी एक कुटी बनवतो. यापेक्षा मी आपली काय सेवा करू शकतो.? " मुनींचे हे उत्तर ऐकून इंद्र आपल्या खऱ्या रुपात प्रकट झाला आणि म्हणाला मला आपल्या कठोर तपस्येमुळे भीती वाटत होती कि आपण माझ्या सिंहासनावर अधिकार तर सांगणार नाहीत ना? त्यामुळे मी आपली तपस्या भंग करण्यासाठी हे सारे केले. मला क्षमा करा." मुनी म्हणाले"देवेंद्र! आपल्याला स्वत:वरच विश्वास नाही तर राज्य कारभार कसे चालवणार. संन्याशाला राज्याची काय गरज?" इंद्र लाजीरवाणा होवून तेथून परत गेला.
तात्पर्य - मनावर संयम असणारेच सत्तेपासून दूर राहू शकतात. भौतिक आकर्षण ज्यांना नसते तेच खरे साधू होत.
8] एकीचे बळ सर्वश्रेष्ठ
एका जातक कथेतील वर्णनानुसार वाराणसीलगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्याने खड्ड्यात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिलाचा जीव वाचवला तेव्हापासून त्याला त्या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्याच्याजवळ येत असत. परंतु त्यांना सर्वांना एका वाघाने फार त्रस्त करून सोडले होते. तो रोज त्यांच्यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याच्यावर भुंकु लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे असणा-या एका मोठ्या खड्ड्यात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले.
तात्पर्य :- एकीचे बळ मोठे असते.
9] ओळख
राजाचे आगमन झाले होते, लोक रांगेत उभे होते, राजांच्या मनात प्रजेबाबत आस्था होती कारण तो राजा प्रजेचे हित जाणणारा होता. राजाच्या रथाच्या पुढे मंत्री, सेनापती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे रथ होते. सर्वात पुढे सैनिक गर्दीला नियंत्रित करीत होते. या जनसमुदायामध्ये एक अंध संन्यासी पण उभा होता. त्याला या अद्भुत सोहळ्याचा आनंद घ्यायचा होता. त्यामुळे तो रांगेतून बाजूला उभा होता. जेंव्हा वाजंत्रीवाले जवळ आले, तेंव्हा सैनिक ओरडू लागले, "सरका ! दूर व्हा! बाजूला व्हा!" अंध संन्यासी म्हणाला,"समजले !" मंत्र्याचा रथ आल्यावरही त्याने संन्याशासहित सर्वाना तसाच दूर होण्याचा आदेश सुनावला. संन्याशी परत उत्तरले,"समजले". असेच सर्व सेनापतीचे रथ येताना झाले, त्यावेळेसही सैनिकाचे आणि संन्याशाचे वरीलप्रमाणेच म्हणणे आले.
सर्वात शेवटी राजाचा रथ आला. संन्याशाला पाहताच राजा तत्काळ रथाच्या खाली उतरला आणि त्यांच्या पाया पडत म्हणाला,"आपण या गर्दीत येण्याचे का बरे कष्ट घेतले? आपण जर आज्ञा केली असती तर मी तुमच्या आश्रमात येवून तुमची भेट घेतली असती." संन्याशी या वेळीही म्हणाला,"समजले !!" राजाने संन्यासी वृद्धाला विचारले,"महाराज ! मी फारसे काही न बोलता आपण समजले असे म्हणता?" तेंव्हा संन्यासी म्हणाले,"आपल्या या सर्व लवाजम्यात मी फक्त आवाजावरून, उच्चारावरून आणि बोलण्याच्या पद्धतीवरून काही निष्कर्ष काढले, ते माझे बरोबर आले त्याला मी समजले म्हणत होतो. सैनिकाचा, सेनापतीचा,मंत्र्याचा वेळेचा सूर हा वेगळा होता आणि मृदू आवाज हा केवळ राजाचा असू शकतो याची मला खात्री होती. राजा मनातून काय समजायचे ते समजला. त्याने त्या अंध संन्याशाला रथातून आश्रमात सोडण्याची व्यवस्था केली.
तात्पर्य-विनम्रतेतून महानता प्रकट होत असते. त्यामुळे कितीही उंची मिळाली तरी अहंकारापासून दूर राहता आले पाहिजे.
10] कर्म आणि धर्म
भगवान गौतम बुद्ध यांना एका गावी प्रवचनासाठी निमंत्रण दिले होते. ज्या शेतकऱ्याने निमंत्रण दिले होते तो अत्यंत भाविक होता. आपणाबरोबर आपल्या गावातील लोकांना याचा लाभ व्हावा हि त्याची इच्छा होती. गावाबाहेरच्या एका विस्तीर्ण अशा मोकळ्या पटांगणात एक वृक्ष होता. त्याला पार होता. तेथे प्रवचन घेण्याचे ठरले. ज्या दिवशी प्रवचन सुरु होणार त्यादिवशीच त्या शेतकऱ्याला चिंतेने ग्रासले, त्याचा सर्वात लाडका बैल हरवला. शेतात बांधून ठेवला असता दावं तोडून बैल निघून गेला. शेतकरी बैलाला शोधायला बाहेर पडला. कोस-दोन कोस चालला. गावापलीकडच्या डोंगराशी कुरण होते. तिथे त्याने बैलाला शोधलं मात्र डोक्यात विचार प्रवचनाचे चालू होते. खूप वेळ निघून गेला होता. शेतकऱ्याला प्रवचनाला जाता आले नाही. तोपर्यंत प्रवचन संपले होते. गावकरी घरी निघून गेले होते. बैल मिळाल्याचा आनंद आणि प्रवचन हुकल्याच दुख असे दोन्ही भाव त्याच्या मनात होते.
दुसऱ्या दिवशी मात्र शेतकरी वेळेत प्रवचनाला हजर राहिला. प्रवचन संपल्यावर विनम्रपणे गौतम बुद्धांच्या पाया पडून तो म्हणाला," महाराज, मी काल प्रवचनाला येवू शकलो नाही. क्षमा करा. माझा बैल हरवला होता. पण बैलाला शोधतानासुद्धा माझे प्रवचन हुकले व चांगले विचार ऐकण्यापासून वंचित राहिलो याचे दुख मनाला डाचत होते." यावर बुद्ध मंदस्मित करीत म्हणाले," चांगल्या गोष्टी ऐकण्यापासून वंचित राहिल्याचे दु:ख तुला झाले यातच तुझे भले आहे. आणि बैलाला शोधणे हे तुझे कर्तव्य आहे. तू बैलाला शोधात असताना सुद्धा प्रवचनाचा विचार करत होता म्हणजेच तू कर्म करत असताना धर्माचा विचार करत होता, कर्म करणे हेच धर्माचे मुख्य सार आहे."
तात्पर्य- कर्माचे पालन म्हणजे धर्माचे पालन होय.
11] काका कालेलकर
काका कालेलकर उच्च कोटीचे चिंतक, लेखक होते. त्यांची विचारक्षमता प्रत्येक विषयात खोल आणि व्यापक होती. एकदा काका आजारी पडले. त्यांच्या आजारपणाची वार्ता प्रसिद्ध होताच अनेक मित्रमंडळी आणि शुभचिंतक त्यांना भेटायला आले. काका सर्वांशी मोठ्या आत्मीयतेने भेट देत असत. एके दिवशी काकांना भेटायला त्यांचे काही मित्र आले होते. चर्चेदरम्यान दुस-या एका मित्राचा फोन काकांना आला. त्याने काकांना विचारले,’’आपण आजारी असल्याचे मी ऐकले आहे, आता कसे वाटते आहे’’ काका म्हणाले,’’ होय, थोडा आजारी पडलो होते मात्र जेव्हापासून मी नव्याने तपासणी केली आहे तेव्हापासून मला बरे वाटायला लागले आहे’’ हे ऐकताच मित्राने नव्या तपासणीविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा काका म्हणाले,’’ मी आजाराबाबत विचार करणेच सोडून दिले आहे आणि हा पर्याय माझ्या आजारावर उपाय म्हणून सिद्ध झाला आहे. एखादा पाहुणा चांगला पाहुणचार केल्यामुळे जास्त दिवस मुक्काम करतो तेच त्याचयाशी उलटपक्षी वागले असता म्हणजेच घरातल्यांशी जसे वागतो, तशी साधी वागणूक मिळाली, विशेष पाहुणचार न मिळाल्यास तो अशा घराचा रस्ता धरतो जिथे चांगले आदरातिथ्य केले जाईल. आजाराबाबतीतही माझा हाच विचार आहे.’’ काकांच्या नव्या उपचार पद्धतीवर मित्रांसह सर्वच लोक सहमत झाले.
तात्पर्य :- आजारापेक्षा जास्त त्याची चिंता तणाव वाढवते. त्यामुळे कोणत्याही शारीरिक अस्वस्थतेला सकारात्मक विचाराने घेण्याचा प्रयत्न करा.
12] क्रोध
एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्या वेळी काहीच न कळाल्याने रस्ता चुकले. जंगल घनदाट होते, तेथे न पुढे जाण्याचा मार्ग दिसत होता ना मागे येण्याचा. तेव्हा तिघांनीही असा निर्णय घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे. तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले. पहिली पाळी सात्यकीची होती. सात्यकी पहारा करू लागला तेव्हाच झाडावरून एका पिशाच्चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलावू लागले. पिशाच्चाने बोलावलेले पाहून सात्यकी संतापला व क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला. त्याक्षणी पिशाच्चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्लयुद्ध झाले. पण जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा होई व ते सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे. एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले. सात्यकिने त्यांना पिशाच्चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्चाने मल्लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्चाशी लढायला गेले तर त्याचा आकार हा वाढलेला त्यांना दिसून आला. ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाच्चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती. पिशाच्चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आव्हान दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पहात राहिले. पिशाच्च अजून संतापले व मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले पण श्रीकृष्ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले व एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसे जसे पिशाच्चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट झाली शेवटी आकार लहान होत होत पिशाच्चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णांनी अलगद त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले. सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले,’’ तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते. त्याला शांती हेच औषध आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो. मी शांत राहिलो म्हणून हे पिशाच्च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे.’’
तात्पर्य : क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो. क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे, प्रेमानेच कमी करता येते.
13] खरा कवी
एका राजाला त्याच्या खऱ्या कवीची नियुक्ती करायची होती. त्यासाठी त्याने दवंडी पिटवली. दवंडी ऐकताच राज्यभरातून हौशे-नौशे कवींची ही मोठी गर्दी राजाच्या महालात जमा झाली. महाल त्यामुळे भरून गेला. त्यातून खरा कवी कसा निवडावा हा एक गहन प्रश्न होता. थोडावेळ विचार केल्यावर राजाला एक युक्ती सुचली. त्याने प्रधानाला आज्ञा केली कि या सर्व कवींना चाबकाचे फटके मारा. राजाची आज्ञा ऐकताच निम्मे अधिक कवी तिथून पसार झाले. तरीही शेकडो कवी तेथे उरलेच होते. राजाने पुन्हा आज्ञा केली,"या सर्व कवींना अन्न पाण्याविना आठवडाभर उपाशी ठेवा."
तरीही १०-२० उरलेच. त्यातून खऱ्या कवीची निवड करण्यासाठी राजाने आज्ञा दिली कि या उरलेल्या कवींना तेलाच्या काहिलीत टाका. राजाची ती जीवघेणी आज्ञा ऐकताच एका कवीखेरीज बाकीचे सर्व कवी तेथून पसार झाले. उरलेला कवी मात्र त्याच्या काव्यलेखनात मग्न होता. तो इतका रममाण झाला होता कि त्याला या आज्ञाच मुळी ऐकू गेल्या नाहीत. राजाने त्याला राजकवी म्हणून घोषित केल्यावर विनयपूर्वक तो राजाला म्हणाला,"महाराज ! राजकवी व्हायला माझी काही हरकत नाही पण मी कुणाच्या मर्जीचा गुलाम असणार नाही. मला वाटेल तेंव्हा मी दरबारात येईन आणि वाटेल तेंव्हा दरबारातून निसर्गाच्या सान्निध्यात निघून जाईन. माझी ही अट मंजूर असेल तरच मी राजकवी होतो नाहीतर हे इतके लोक निघून गेले तसा मी पण जातो." राजाला कवीची ओळख पटली. त्याने त्याच्या कविता ऐकल्या व खुश होवून त्याच्या मर्जीनुसार सगळे मान्य करून त्याला 'राजकवी' म्हणून घोषित केले.
तात्पर्य- खरा कलाकार हा कुणाच्या मर्जीचा गुलाम नसतो.
14] खरा वेडा कोण
एका वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये वेड्यांना बाहेर पडेपर्यंत म्हणजेच पूर्ण बरा झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी अनेक मानसशास्त्रीय चाचण्यांना तोंड द्यावे लागत असे. त्यातील शेवटच्या चाचणीमध्ये वेड्यासमोर एक नवे कोरे चकचकीत पाच रूपयांचे नाणे आणि एक मळकट पन्नास रूपयांची नोट ठेवली जाई. त्यातील फक्त एकच गोष्ट त्याला उचलण्यास सांगितली जाई. वेड्याने पन्नास रूपये उचचले की त्याला डिसचार्ज दिला जाई व तसे न केल्यास त्याला पुन्हा एकदा चाचण्या पार करायला सांगितल्या जात. गरज पडल्यास पुन्हा उपचारासाठीही पाठविले जाई.
हॉस्पीटलमधील एक वेडा शेवटच्या चाचणीपर्यंत सगळ्या चाचण्या पटापट पार करत असे मात्र शेवटच्या चाचणीला मात्र नापास होत असे. अनेकदा असे घडल्यावर चाचणी घेणारे डॉक्टर कंटाळले व त्यांनी एक युक्ती केली पुढच्या वेळेला त्या वेड्यासमोर एक पाच रूपयांची जुनी नोट व पन्नास रूपयांची कोरी करकरीत नवी नोट ठेवली तरीही त्या वेड्याने पाच रूपयांचीच नोट उचचली. हे पाहून डॉक्टर आश्चर्यचकित झाले व ओरडले,'' अरे मूर्खा, सगळ्या चाचण्या आरामात पार करतोस आणि शेवटच्या चाचणीत मात्र कायम चुकतोस. तुला पाच आणि पन्नास यातील फरक कळत नाही काय'' वेडा शांतपणे म्हणाला,'' ते मला चांगलं कळतं डॉक्टरसाहेब, पण इथून बाहेर पडलो की, मला रोजचा खर्च स्वत:लाच करावा लागणार आहे. त्यापेक्षा पाच रूपयांचे नाणे उचचले की, मला इथून बाहेर पडावे लागत नाही, पाच रूपयेही मिळतात आणि खाणेपिणेराहणे सगळे काही फुकटात होते. मग मी पन्नास रूपयांची नोट उचलून स्वत:च्या पायावर धोंडा पाडून का म्हणून घेऊ''
15] गुरुनानक आणि नवाब
एकदा गुरुनानक सुलतानपूरच्या नवाबाकडे घरी गेले. नवाबानी गुरुदेवांचे आत्मीयतेने स्वागत केले. त्यानंतर दोघांच्यामध्ये धर्मावर चर्चा सुरु झाली. नवाबानी म्हटले, आपण हिंदू-मुस्लीम यामध्ये काहीच अंतर करत नाही. त्यामुळे आज तुम्ही माझ्याबरोबर नमाज अदा करण्यासाठी चला. नानकदेव म्हणाले,देणारा एक आहे आणि घेणारा एक आहे तर मी कोण अंतर करणारा? चला मशिदीत चला. दोघेही मशिदीत गेले.
नवाबसाहेब नमाज अदा करू लागले, नानकही ध्यानमग्न होवून एका मुद्रेत उभे राहिले. नमाज होताच नवाब म्हणाले, आपण तर नमाज अदा केली नाही. नानक म्हणाले, "माफ करा! आपण जेंव्हा नमाज अदा करत होता तेंव्हा माझे मन माझ्या स्वामींकडे होते. त्या वेळी मला आपल्या स्वामींच्या व्यतिरिक्त काहीच दिसत नव्हते. मात्र आपले लक्ष नमाजाकडे कमी आणि माझ्याकडे जास्त होते काय? आपण देवाचा धावा करतो तेंव्हा आपले मन हे दुसऱ्या कोणत्या गोष्टीत जायला आहे." नवाब खजिल होवून म्हणाले, "खरे आहे! माझे लक्ष तुम्ही काय करता यात लागले होते. आम्ही देवाकडे काही तरी मागणी करण्यासाठी येतो तर तुम्ही फक्त देवासाठी इथे येता." गुरु नानक म्हणाले,"आपण सारी एकाच ईश्वराची लेकरे, नावे वेगळी दिली तरी देव बदलतो काय? तो सर्व पाहत आहे."
तात्पर्य-ईश्वर एक आहे आणि त्याला प्राप्त करण्यासाठी एकाग्र चित्ताची गरज आहे.
16] धर्म म्हणजे काय?
एकदा एका राजाने दवंडी पिटवली की जो कोणी मला सर्वश्रेष्ठ धर्माचे महत्व समजावून सांगेल त्याला मी मोठे बक्षीस देईन व तो धर्म मी स्वीकारेन. ही वार्ता ऐकताच सगळीकडे मोठमोठे धर्मगुरु, धर्मोपदेशक, आचार्य राजाला आपल्या धर्माचे महत्व समजावून सांगण्यासाठी येऊ लागले. ते सर्वच जण एकच गोष्ट आठवणीने करत होते की स्वत:च्या धर्माचे महत्व सांगताना मात्र दुस-याला धर्माला कमी लेखत होते. दुस-याच्या धर्माची निंदानालस्ती करत होते. यातून एकच झाले की, राजाला काहीच कळेना की कोणता धर्म सर्वश्रेष्ठ आहे व त्यामुळे तो दु:खी होत होता. पण त्याने शोध सुरुच ठेवला. वर्षानुवर्षे हाच क्रम चालू राहिला.
राजा वृद्ध होत चालला. शेवटी राजा एका साधूच्या दर्शनास गेला. तेथे गेल्यावर त्याने साधूला नमस्कार केला व म्हणाला,''साधूमहाराज, मी सर्वश्रेष्ठ धर्माच्या शोधात आहे पण आजपर्यंत मला सर्वश्रेष्ठ धर्म कोणता हेच कळाले नाही.'' साधूने राजाकडे पाहिले व म्हणाले,''सर्वश्रेष्ठ धर्म तर जगात अस्तित्वातच नाहीत. जगात एकच धर्म आहे आणि बाकी सगळे हे त्या धर्माला फुटलेले अहंकार आहेत. धर्म तर तोच असतो जिथे व्यक्ती निष्पक्ष असतो, पक्षपात करणा-या मनात धर्म राहूच शकत नाही.'' साधूचे हे बोलणे ऐकून राजा प्रभावित झाला. साधू पुढे जाऊन राजाला म्हणाला,''राजन, चला आपण नदी पार करून पलीकडे जाऊया'' नदीतीरावर दोघे पोहोचले, त्यांनी तिथे अनेक सुंदर नावा (होडया) पाहिल्या. साधू राजाला म्हणाले,'' राजे, चला आपण एका सर्वश्रेष्ठ नावेतून पैलतीर गाठूया'' प्रत्येक नावेपाशी जाताच साधू त्या नावेबद्दल काही ना काही चुक दाखवित असे व पुढे जात असे. असे करता करता दुपार झाली. राजाला भूक लागली व त्रासून राजाने साधूला म्हटले,''महाराज आपल्याला नावेतून फक्त पलीकडे जायचे आहे, अहो इतकी छोटी नदी आहे की पोहूनसुद्धा आपण पटकन पलीकडे पोहोचून जाऊ मग त्याची इतकी चर्चा कशाला'' साधूने राजाकडे पाहिले व म्हणाले,'' राजन, हेच तर मला तुम्हाला सांगायचे आहे. धर्माला नाव नसतेच, धर्म आपल्याला स्वत:ला पोहून पार करायचा असतो. दुसरा कोणी आपल्याला धर्मापलिकडे पोहोचवू शकत नाही. आपल्यालाच जावे लागते.'' राजा सर्व काही समजून चुकला.
17] नीवड
दुर्गम भागात फिरताना तीन साधुना एक झोपडी दिसते, ते झोपडीचा दरवाजा वाजवतात. घरातील महिला त्यांच्याकडे विचारणा करते,"आपण कोण आहात? आणि आपल्याला काय हवे आहे?" ते म्हणतात,"आम्ही तिघे भुकेले आहोत, अन्नाची काही व्यवस्था करा." झोपडी बाहेरील झाडाखाली विश्रांती करण्याची विनंती करत महिला पुन्हा घरात गेली, काही काळानंतर बाहेर येत ती तिन्ही साधूना जेवणासाठी आमंत्रित करते. तेंव्हा साधू म्हणतात," आमच्यापैकी केवळ एकचजण फक्त तुझ्या घरात प्रवेश करू शकतो." महिला आश्चर्यचकित होते व विचारते," असे का? भूक तिघानाही लागली आहे. पण येणार मात्र एकचजण?" साधू म्हणतात," हा आमच्यातील करार आहे. आमच्यातील एक "वैभव" आहे. तर दुसरा "यश" आणि तिसरा "प्रेम". आता तू ठरव कि आमच्यातील कोणाला आत बोलवायचे?" महिला गोंधळून जाते.
ती पुन्हा घरात जाते, नवऱ्याशी चर्चा करते आणि बाहेर येते व "प्रेम" नावाच्या साधूला जेवणासाठी निमंत्रण देते. प्रेम घरात येताच त्याच्या पाठोपाठ "वैभव" आणि "यश" साधू पण जेवणासाठी घरात येतात. महिला पुन्हा गोंधळून जाते, तेंव्हा साधू म्हणतात," मुली ! तू प्रेम मागितले, त्या पाठोपाठ यश आणि वैभव तुझ्या घरात प्रवेशकर्ते झाले, पण तू वैभव किंवाप्रेम यांना जर पाचारण केले असते तर आमच्यातील दोघे उपाशी राहिले असते." महिलेने तिघांचे यथायोग्य स्वागत करून त्यांचे आदरातिथ्य केले.
तात्पर्य -जगात प्रेमापाठोपाठ यश आणि वैभव हि आयुष्यात,घरात येते.
18] पती पत्नी आणि त्यांचा मुलगा
एक भक्त कुटुंब होतं. त्यात पती-पत्नीव्यतीरिक्त त्यांचा मुलगाही होता. तिघेही ईश्वरावर विश्वास ठेवत नसत. एकदा त्यांचा मुलगा आजारी पडला. त्यांनी खूप उपचार केले. पण तो ठीक झाला नाही. त्याचवेळी पतीला एका कामासाठी दुसऱ्या शहरात कामासाठी जावे लागले, त्याने पत्नीकडे चिंता व्यक्त केली. मात्र पत्नीने त्याला आश्वासन दिले कि ती मुलाची यथायोग्य काळजी घेईल. पती गावाला निघून गेला. दुर्दैवाने तो जाताच मुलगा मरण पावला. पत्नीने मोठ्या धैर्याने मुलाचे प्रेत झाकून ठेवले आणि संध्याकाळी पती येण्याच्या वेळेत स्वयंपाक करू लागली, पतीने येताच विचारले, मुलाची तब्येत कशी आहे? पत्नी म्हणाली, आज तो विश्रांती घेत आहे. तुम्ही आधी जेवण करून घ्या.
त्यानंतर त्याच्याकडे जा. पती जेवण करू लागला. तेव्हा पत्नी म्हणाली, "शेजारणीने माझ्याकडे भांड्यात पाणी मागितले होते, मी तिला दिले, आता जेंव्हा मी माझे भांडे मागत आहे, तेंव्हा ती माझ्यावरच चिडत आहे. भांडत आहे व भांडे माझेच म्हणून हट्ट धरून रडत बसली आहे." पती म्हणाला,"मूर्ख बाई आहे ती ! दुसऱ्याची वस्तू परत करण्यासाठी कुठे रडत बसायचे असते का?" तोपर्यंत पतीचे भोजन झाले होते. तेंव्हा पत्नी म्हणाली, "आपला मुलगा हे पण ईश्वराचे देणे होते, ती वस्तू आज ईश्वराने परत मागून घेतली आहे. मग आपणही शेजारणी सारखे रडत बसायचे का?" पतीने पत्नीच्या तोंडाकडे पाहिले आणि त्याला सगळा मामला समजून आला, तो म्हणाला,तू ठीक म्हणतेस. मग त्या दोघांनी मिळून आपल्या मुलाचे पुढील अंतिम संस्कार मोठ्या धैर्याने पूर्ण केले.
तात्पर्य- मानवी जीवन परमेश्वराची देणगी आहे. ते संपल्यावर आपले काहीच चालत नाही.
19] पिसन हारीची विहीर
प्राचीन भारतात बालविवाहाची प्रथा होती. याचा मोठा दुष्परिणाम म्हणजे त्याकाळी मुलीना अशिक्षित ठेवले जायचे आणि एखाद्या मुलीचा पती मृत्यू पावल्यास तिला आयुष्यभर दुख:च सोसावे लागे. मेहनत आणि मजुरीशिवाय तिच्याकडे पर्याय नसे. अशीच एक गरीब बालविधवा पूर्व मथुरेजवळ राहत होती. ती एकटीच होती आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी ती पिठाची गिरणी चालवायची. एक दिवस तिच्या मनात गावातून शहराकडे जाणा-या रस्त्यावर एक विहीर खोदण्याचा विचार आला. कारण त्या मार्गावर पिण्याच्या पाण्याची काहीच सोय नव्हती. मात्र त्या बिचाऱ्या गरीब विधवेकडे विहीर खोदून घेण्यासाठी पैसेही नव्हते. शेवटी तिने विचार केला कि दिवसभरात ती दोन आणे मिळवते त्यातील दोन पैसे पाठीमागे टाकायला पाहिजेत. तिने पैसे जमवायला सुरुवात केली.
असे करता करता तिने अनेक वर्षे पैसे मागे टाकले. वृद्धावस्थेत तिच्याकडे एक हजार रुपये जमा झाले. (त्या काळी हजार रुपयांना खूप किंमत होती) त्यावेळी तिने आज दिल्ली-आग्रा नावाने ओळखल्या जाणाऱ्या मार्गावर एक पक्की विहीर खोदली. आजही ती विहीर तिच्या नावाने ओळखली जाते. लोक त्या विहिरीला पिसन हारीची विहीर म्हणून ओळखतात. त्या मार्गावर ती गरीब विधवा तिच्या पश्चात पण प्रसिद्ध आहे. लोक तिथे थांबतात, पाणी पितात आणि मनातून तिच्या कार्याचे आभार मानतात.
तात्पर्य -मर्यादित साधने असतील पण दृढ संकल्पशक्ती असेल तर अशक्य वाटणारे काम शक्य होते.
20] पैसा कसा वाचवाल
हि गोष्ट आहे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांची. राजेंद्रबाबूंची राहणी खूपच साधी होती. एकदा चालताना राष्ट्रपती राजेन्द्रबाबुना त्रास होवू लागला. लक्षात असं आलं कि त्यांच्या चपला झिजल्या आहेत आणि त्याला मारलेला खिळा त्यांच्या पायाला टोचू लागला आहे. मग राष्ट्रपतींनी आपल्या स्वीय सहाय्यकाला नवीन चप्पल आणण्यास सांगितले. त्याने सेवकासोबत जावून नवीन चपलांचा जोड आणला. राष्ट्रपतींनी विचारले," या चपलेची किंमत किती?" "सोळा रुपये" सहाय्यकाने सांगितले. "सोळा रुपये? गतवर्षी मी माझ्या चपला बारा रुपयांना घेतल्या होत्या.तुम्ही खात्री करा."राष्ट्रपती म्हणाले. यावर स्वीय सहाय्यक म्हणाले,"साहेब त्या दुकानात बारा रुपयांच्या पण चपला आहेत.पण त्यापेक्षा या चपला मऊ आणि चांगल्या आहेत. आणि मुख्य म्हणजे मऊ असल्याने टोचणार नाहीत. म्हणून सोळा रुपये देवून मीच आणल्या. आपल्या सेवकाचेही या चपलाबाबत मत चांगले वाटले.
" राष्ट्रपती म्हणाले, "अहो मऊ चपला आहेत आणि चांगल्या दिसतील म्हणून तुम्ही चार रुपये जास्त मोजले कि. नको त्यापेक्षा असे करा कि या चपला दुकानात परत करा आणि मला बारा रुपयांच्याच चपला आणून द्या. आणि महत्वाचे म्हणजे त्यासाठी वेगळा असा हेलपाटा घालू नका. त्या बाजूला येणाऱ्या जाणाऱ्या कोणाकडून तरी हे काम करून घ्या. अन्यथा असे व्हायचे कि चपलेत चार रुपये वाचविण्यासाठी तुम्ही पाच रुपयांचे पेट्रोल खर्च करून गाडीने जाताल." स्वीय सहाय्यक हे सर्व ऐकतच राहिले. देशाच्या सर्वोच्च पदी बसणाऱ्या व्यक्तीबद्दल त्यांचा आदर आणखी वाढला.
तात्पर्य- पैशांची अकारण उधळपट्टी करू नये.
Best Marathi story & Marathi story with moral for kids (Marathi goshti)
21] प्रामाणिक मुलगा
एक मुलगा खूपच सरळमार्गी आणि प्रामाणिक होता. त्याच्यावर त्याच्या आईवडीलांनी चांगले संस्कार केले होते व त्या संस्कारांना अनुसरुन तो वागत होता. एकदा काही निमित्ताने तो शेजा-याच्या घरी गेला. शेजारी कुठेतरी बाहेर गेला होता. शेजा-याच्या नोकराने मुलाला बसायला सांगितले आणि नोकर निघून गेला. मुलगा जिथे बसला होता तिथे जवळ एका टोपलीत उत्तम दर्जाची सफरचंदे ठेवली होती. त्या मुलालाही सफरचंद खूप आवडत असत पण त्याने त्यांना हात लावला नाही. तो शेजा-याची वाट पाहात बसला होता. ब-याच वेळाने शेजारी घरी परतला त्याने पाहिले की मुलगा बसला आहे व त्याच्याशेजारी सफरचंदे असूनही तो त्यांना हातसुद्धा लावत नाही.
मुलाला सफरचंद खूप आवडतात हे शेजा-याला माहित होते. शेजारी येताच मुलाने उठून नमस्कार केला, शेजा-याने त्याला जवळ घेतले व विचारले,''तुला सफरचंद तर खूप आवडतात ना, मग तरीसुद्धा एकही सफरचंद उचलून का खाल्ले नाहीस'' मुलगा म्हणाला,'' इथेच कोणीच नव्हते, मी दोन तीन सफरचंदे जरी उचलून घेतली असती तरी कुणालाच कळले नसते, कोणीच मला पाहात नव्हते पण कोणी पाहत नव्हते पण मी स्वत:ला ते पाहात होतो. परंतु मी स्वत:ला फसवू शकत नाही.'' शेजा-यास त्याच्या या बोलण्याचा आनंद वाटला. त्याने त्याला शाबासकी दिली व म्हणाला,'' आपण करतो ते आपला आत्मा पाहात असतो, आपण आपल्याला कधीच फसवू शकत नाही. दुस-याला लाख फसवू पण स्वत:शी खोटे बोलणे फार अवघड आहे. सर्वांनीच तुझ्यासारखे वर्तन केल्यास जग सुखी होईल.''
तात्पर्य :- लहानपणीच मुलांना खोटे वागणे, बोलणे यापासून दूर ठेवल्यास मुले भविष्यात योग्य वर्तन करतील. वाईट गुण घेण्यास क्षणाचाही विलंब लागत नाही पण चांगले शिकण्यास खूप काळ जावा लागतो. मुले वाईट वर्तनाची निघाल्यास त्याचा दोष आईवडीलांना येतो.
22] बुध्दीच सर्वश्रेष्ठ
दोन व्यक्ती आपसात भांडत होत्या. एकजण धनाला तर दुसरा बुद्धीला सर्वश्रेष्ठ म्हणत होता. काहीच मार्ग निघत नाही हे पाहून दोघेही देशाच्या राजाकडे गेले आणि न्याय मागू लागले. राजाही काही निर्णय घेवू शकला नाही. त्याने एक पत्र देवून त्या दोघांना रोमच्या सम्राटाकडे पाठविले. जेंव्हा दोघांनी ते पत्र रोमच्या सम्राटाला दिले तेंव्हा त्यातील गोम ओळखून त्याने त्या दोघाना फाशी देण्याची आज्ञा केली. हे ऐकताच दोघांनीही एकमत करण्याचे ठरविले. बुद्धीवानाने धनवानास म्हंटले,"तू समजतोस धन मोठे आहे तर धनाने आता आपल्या प्राणांची रक्षा कर बघू." धनवानाचे प्रयत्न कामी आले नाहीत. त्याने हार पत्करत बुद्धीवानास प्राण रक्षण करण्याची विनंती केली. बुद्धिवान म्हणाला फाशीवर चढताना आपण एकमेकास पुढे ढकलायचे, पुढील गोष्ट मी सांभाळून घेतो. त्याप्रमाणे त्यांनी केले. प्रथम फाशी जाण्यासाठी दोघे धक्काबुक्की करू लागले तेंव्हा रोमच्या सम्राटाने कारण विचारले. बुद्धीवान म्हणाला,"आमच्या राजाला ज्योतिष्याने सांगितले आहे, मी जेथे मरेन तेथे भयंकर दुष्काळ पडेल आणि माझा मित्र जेथे मरेल तेथे महामारी पसरेल.
त्यामुळे मी मरण्याचा विचार करतो कारण लाखो लोक महामारीपासून बचावतील. आम्हाला फाशी तर आमच्या देशातही देता आली असती पण आमच्या राजाने देशावरचे संकट तुमच्या पदरात टाकले आहे. आता कुणाला फाशी देता ते सांगा?" त्या बरोबर रोमच्या सम्राटाने दोघांची सजा माफ केली. अशा प्रकारे बुद्धीवानाने धनवानाचा जीव स्वतः बरोबर वाचविला.
तात्पर्य-बुद्धी हि सर्वश्रेष्ठ आहे.
23] भाऊबीज
एका गावात एक बहिण भाऊ राहत होते. बहिणीचे आणि भावाचे दोघांचीही लग्ने झाली होती. बहिण तिच्या घरी सुखाने नांदत होती. भावाच्या सुखातसुद्धा काही कमी नव्हती. भाऊबीजेचा सण होता. आज माझा भाऊ जेवायला येणार म्हणून बहिणीने सगळी तयारी केलेली होती. स्वैपाकपाणी आवरून दारात उभी राहून ती भावाची वाट पाहत होती. बराच वेळ झाला तरी भाऊ आला नाही, तेवढ्यात दारी दोन याचक भिक्षा मागण्यास आले. बहिणीने सणाच्या दिवशी याचक न जेवता जाणार म्हणून तिने त्या दोघांना जेवायला वाढले, दोघे याचक पोटभर जेवले. बहिणीला त्यांनी सांगितले,"ताई !आज सणाचा दिवस! तू आम्हाला जेवण दिले. आम्ही याचक नसून यमाचे दूत आहोत आणि यमआज्ञा अशी आहे कि आजपर्यंत ज्या पुरुषाला कुणी शिव्या दिल्या नाहीत, त्याला घेवून ये असे यमराज म्हणाले आहेत. तू आमचा आत्मा तृप्त केला म्हणून आम्ही तुला हे गुपित सांगत आहोत." एवढे बोलून ते निघून गेले.
दुतांचे बोलणे ऐकताच बहिण मनातून खूपच घाबरली कारण ती व तिचा भाऊ हे गावात अजातशत्रू म्हणून ओळखले जात. त्यामुळे या दोघांना कुणी शिव्या देण्याचा प्रसंगच उद्भवला नाही. आपल्या भावावर आज मरणाची छाया दिसताच तिने घराबाहेर धाव घेतली व तिला जितक्या म्हणून शिव्या येत होत्या त्या भावाच्या नावाने देण्यास सुरुवात केली.गावातील लोक चकित झाले, ज्या बहिणी भावाच्या मायेची उदाहरणे साऱ्या पंचक्रोशीत दिली जात होती त्या भावाची बहिण आज त्याला रस्त्याने शिव्या देत सुटली होती. हि बातमी भावापर्यंत पोहोचली, भावाला ज्याने हि बातमी दिली त्याला भाऊ म्हणाला," मित्र ! माझी बहिण मला शिव्या देते आहे यातसुद्धा माझे काहीतरी हित तिने पाहिले आहे." शिव्या देत देत बहिण भावाच्या दाराशी आली, तो यमाचे दूत भावाच्या दारात उभे होते. त्यांना पाहताच बहिणीने भावाच्या नावाने शिव्यांचा शिमगा केला. हे ऐकताच यमाचे दूत त्यांच्या नियमानुसार निघून गेले. बहिण भावाकडे गेली व भावाला शिव्या देण्याचे गुपित सांगितले. एका बहिणीने शिव्या देवून भावाचा अपमृत्यू टाळला होता.
24] मनाची एकाग्रता
एकेकाळी एक वृद्ध योद्धा होता. त्याच्या काळातील तो सर्वत्र प्रसिद्ध असा योद्धा होता. त्याला कोणत्याही प्रकारच्या युद्धात कुणीच हरवू शकत नसे. त्याची ख्याती सर्वत्र पसरली होती. त्याने त्याच्या शिष्यांना व मुलांना युद्धकलेचे शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी एक तरूण योद्धाही प्रसिद्ध होत होता. दिग्गज योद्धेही तरूण योद्ध्यासमोर हार मानत असत. प्रतिस्पर्ध्याचे कच्चे दुवे ओळखून त्याला सहज पराभूत करण्यात त्याचा हातखंडा होता.
अतिशय कमी कालावधीत त्याने वृद्ध योद्धा सोडल्यास सर्व योद्ध्यांना पराभूत केले होते. त्याचे नाव सर्वत्र गाजू लागले. मिळणारी प्रसिद्धीचा आता त्याच्या मनात अहंकार जागृत झाला. त्याने विचार केला की या वृद्धालाही हरवून 'अजिंक्य' हे बिरूद लावून मिरवू. त्याने वृद्ध योद्ध्याला आव्हान दिले. शिष्यांनी मनाई केली तरी वृद्धाने त्याचे आव्हान स्वीकारले. तरूण योद्धा ठरलेल्या दिवशी वेळेवर रणांगणात येऊन उभा राहिला. भविष्यातील विजयाची कल्पना मनात धरून तो आनंदी होत होता. पण वृद्ध मात्र शांत आणि संयमित स्थितीमध्ये त्याच्यासमोर उभा होता. युद्ध सुरु झाले. तरूणाच्या प्रत्येक वाराला वृद्धाकडे प्रतिवार तयार होता.तरूण योद्धा हळूहळू का होईना दमू लागला आणि आपण युद्ध हरतो आहे हे लक्षात येताच त्याने वृद्धाला अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. जेणेकरून वृद्धाचे लक्ष विचलित होईल पण त्याचा उपयोग झाला नाही. वृद्ध अविचल राहिला त्याचा संयम ढळला नाही. अखेरीस तरूण योद्धा पराजित झाला. त्याने स्वत:हून हार पत्करली व तेथून पराजित होऊन निघून गेला. तो गेल्यावर शिष्यांनी व वृद्धाच्या मुलांनी वृद्धाला विचारले,''बाबा, तो तरूण तुम्हाला अपशब्द वापरत होता तरी तुम्ही शांत कसे राहिलात'' तेव्हा वृद्ध गुरु म्हणाला,'' मुलांनो कोणत्याही युद्धात शारीरिक बळाबरोबरच मनाची एकाग्रता महत्वाची असते. कोणत्याही परिस्थितीत मन कणखर असेल तर तुमचा विजय निश्चित आहे.''
तात्पर्य : मनाची एकाग्रता साधल्याने बरेचशी कामे साध्य होतात. मन एकाग्र करून कोणतेही काम केल्यास हमखास यश मिळतेच.
25] मनोबल
एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हा राजा त्यात विजयी झाला. काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होत चालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही. एकेदिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्ये पाणी कमी होते त्यामुळे हत्ती पुढेपुढे गेला आणि दलदलीत फसला. वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून निघणे शक्य नव्हते, त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून माहूत त्याच्याकडे धावत आले, परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेंव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली.
कारण भाल्याच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पण हत्ती बाहेर येऊ शकला नाही.भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. राजापर्यंत हि वार्ता गेली. त्याने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावणे पाठविले. माहूत आला, राजा शेजारीच उभा होता. त्याने राजाला असा सल्ला दिला,"महाराज! तत्काळ युद्धाचे नगारे वाजवा, सैन्य या सरोवराभोवती गोळा करा, आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्यायला सांगा." राजाने त्याचे म्हणणे ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा हुकुम दिला. मग काय म्हणता, नगारे वाजू लागले, सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या, आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या. त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेर पडला. त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते. राजाने जुन्या माहुताचे आभार मानले आणि बक्षीस दिले.
तात्पर्य-निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते.
26] महिलेचा निर्भीडपणा
एकदा खलिफा उमरला जनतेस मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यांचे भाषणही प्रभावी झाले. अधूनमधून लोकांनी खलिफांना प्रश्नही विचारले. त्यांची खलिफानी समाधानकारक उत्तरेही दिली. खलिफाकडून धर्म आणि नीतीबाबत औत्स्युक्य असणा-या लोकांच्याही प्रश्नांची उत्तरे दिली. याच क्रमाने खलिफाने लोकांना प्रश्न केले. तो म्हणाला,'' जर मी तुम्हाला लोकांना काही आदेश दिला तर तो पाळाल काय'' मोठ्या संख्येने लोकानी सहमती दर्शविली पण एक महिलेने म्हटले,'' नाही, आम्ही तुमचा आदेश पाळणार नाही.'' हे ऐकताच गर्दीतूनही राग व्यक्त झाला. खलिफाने सर्वांना शांत राहण्यास सुचविले.
त्या महिलेला याचे कारण विचारले असताती म्हणाली,''तुम्ही तुमचा पायजमा खूपच लांब घातला आहे. माझ्या पतीचा पायजमा गुडघ्यापर्यंतही येत नाही यावरून असे स्पष्ट होते की तुमच्या शाही भांडारामध्ये तुम्ही तुमच्या हिश्श्यापेक्षा जास्त कपडा घेतला आहे.'' महिलेला यातून असे सुचवायचे होते की खलिफाचे बोलण्याप्रमाणे वर्तन नाही. यावर खलिफा म्हणाला,''मला याबाबत माहित नाही पण माझा मुलगा याबाबत उत्तर देईल.'' खलिफाचा मुलगा पुढे आला व त्याने सांगितले,''माझ्या वडिलांनी शाही भांडारातून कपडा घेतलेला नाही. माझ्या हिश्श्याचे कापड मी वडिलांना दिले. सगळ्याप्रमाणेच माझे वडीलही कापड घेत होते त्यात मी वाढ केली'' महिलेचे या उत्तराने समाधान झाले. यावर खलिफा नाराज न होता त्या महिलेला धन्यवाद देऊ लागले कारण खलिफाच्या मते जोपर्यंत जनतेत प्रामाणिक व निर्भीडपणे बोलणारे लोक असणार नाही तोपर्यंत राज्याला किंवा धर्माला धोका नसतो.
27] मुल्यांकन
एका महात्म्याच्या शिष्यांमध्ये एक राजकुमार आणि एक शेतकऱ्याचा मुलगा होता. राजकुमाराला राजपुत्र असण्याचा अहंकार होता.मात्र शेतकऱ्याचा मुलगा विनम्र आणि कर्मठ होता.राजकुमाराचे वडील अर्थात तेथील राजा दरवर्षी एका स्पर्धेचे आयोजन करीत असत. त्यात बुद्धिमत्ता आणि दृष्टीची पारख केली जात असे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दूरदूरचे राजकुमार येत असत. अध्ययन पूर्ण झाल्यावर राजकुमाराने शेतकऱ्याच्या मुलालाही या स्पर्धेत सामील होण्याचे आमंत्रण दिले. कारण त्याला तेथे बोलावून त्याचा अपमान करण्याचे त्याच्या मनात होते. जेंव्हा शेतकऱ्याचा मुलगा स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचला तेंव्हा त्याला राजकुमार आणि राजपुत्रांमध्ये बसण्यास मनाई केली.
शेवटी शेतकऱ्याचा मुलगा वेगळा बसला. राजाने प्रश्न विचारला,"तुमच्यासमोर जर जखमी वाघ आला तर तुम्ही त्याच्यावर उपचार कराल का त्याला तसेच सोडून निघून जाल ?" सर्व राजपुत्रांचे उत्तर हे एकच होते. "आम्ही आमचा जीव धोक्यात घालून वाघावर उपचार करणार नाही." मात्र शेतकऱ्याचा मुलगा म्हणाला," मी जखमी वाघावर उपचार करेन कारण जखमीचा जीव वाचविणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे. माणूस होण्याच्या नात्याने माझे हे कर्म आहे. मांस खाणे हे जर वाघाचे कर्म असेल तर तो बरा झाल्यावर माझा जीव का घेईना ? त्यात त्याचा दोष नाही. माणूस म्हणून मी त्याच्यावर उपचार करणे हे माझे आद्यकर्तव्य आहे." हे उत्तर ऐकताच राजाने त्या मुलाला विजयी घोषित करून राज्याचे मंत्रिपद दिले.
तात्पर्य-व्यक्तीचे मुल्यांकन हे त्याच्या विचारातून होत असते. त्याच्या राहणीमानावरून कि त्याच्या दिसण्यावरून होत नसते. कधी कधी साधारण दिसणारी माणसे असाधारण कार्य करतात.
28] यक्ष आणि यक्षिणी
एका चंदन व्यापाऱ्याला २ मुले होती. एकदा व्यापाऱ्याने व्यापाराच्या निमित्ताने दोघांना अरब देशात पाठवले, दोघेही जहाजाने गेले. दुर्दैवाने वादळात अडकल्याने जहाज भरकटले आणि दोघेही भाऊ एका बेटावर आले. तेथे एका यक्षिणीची भेट झाली. ती अत्यंत सुंदर होती. यक्षिणीने तिचा सुंदर असा महाल पाहण्यास त्यांना नेले. तेथे गेल्यावर त्यांचा दोघांचा सत्कार केला. दोघेही खूप खुश झाले. दुसऱ्या दिवशी ते बेटावर फिरायला निघाले, तेंव्हा एका व्यापाऱ्याला गंभीर अवस्थेत पहिले, त्याला विचारल्यावर त्याचेही जहाज भरकटल्याचे त्याने सांगितले, येथे एका यक्षिणीने त्याचे स्वागत केले, परंतु एका गोष्टीवरून नाराज होवून तिने त्याचे हाल केले. व्यापाऱ्याने पुढे सांगितले, एका निश्चित तिथीला येथे एक यक्ष घोड्याचे रूप धारण करून येतो आणि प्रार्थना केल्यानंतर समुद्राच्या पलीकडे नेवून सोडतो परंतु त्या घोड्यावर सवार झालेल्या व्यक्तीने मागे पळत येणाऱ्या यक्षिणीकडे वळून पाहिल्यानंतर तो यक्ष त्या व्यक्तीला समुद्रात फेकून देतो. दोन्ही भावांनीहि त्या यक्षाला समुद्राच्या पलीकडे नेवून सोडण्याची विनंती केली. यक्षाने ती मान्य केली. दोघेही यक्ष बरोबर घोड्यावर स्वार झाले. त्याबरोबर मागे थांबण्यासाठी आवाज दिला. लहान भाऊ स्वत:वर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि त्याने मागे वळून यक्षिणीकडे पाहिले त्याबरोबर यक्षाने त्याला समुद्रात फेकून दिले. त्याक्षणी यक्ष म्हणाला , हे मूर्ख मनुष्या!तू स्वत:वर नियंत्रण न केल्याने तुला मृत्यू हा स्वीकारावा लागेल." लहान भावाने ऐकले पण खूप उशीर झाला होता. खोल समुद्रात बुडून तो मरण पावला.
तात्पर्य- एखादी गोष्टीचे दुष्परिणाम माहित असताना सुद्धा जर मानवाने स्व: नियंत्रण केले नाही त्याचे फळ भोगावे लागते.
29] राजाचा अंत
एका देशाचा राजा हा लालची होता. तो आपली तिजोरी भरण्यासाठी प्रजेवर वेगवेगळे कर लादीत असे. एकदा राजा खूप आजारी पडला, अंतिम घटिका जवळ आली, यमाचे दूत नेण्यासाठी समोर उभे ठाकले असता, यमदूतांना समोर पाहून घाबरून राजाने विनवणी केली,"हे यमदूत!मला आणखी काही दिवस जगू दे, मी प्रजेच्या भल्यासाठी काही नवीन योजना तयार केल्या आहेत. त्यांना साकार करण्यासाठी मला आणखी काही दिवस वाढवून दे."
यमदुताने त्याला म्हटले,"राजन!प्रत्येक मनुष्य अमर होवू इच्छितो, पण ते शक्य नाही." हे ऐकूनही राजाचा अजूनही आग्रह सुरूच होता. तेंव्हा यमदुताने राजाच्या हातात एक कलश देत सांगितले, " ह्या कलशात तुझे जीवनजल भरले आहे. जोपर्यंत तू हे पीत राहशील तोपर्यंत तू जिवंत राहशील." राजाने विचारले," परंतु हे जल संपले तर?" यमदूत म्हणाले," तू थोडे थोडे पीत राहा ते दीर्घकाळ पर्यंत जाईल आणि तू जिवंत राहशील, एकदाच पिण्याचा प्रयत्न केलास तर तुझा मृत्यू अटळ आहे." राजाने काही दिवसांपर्यंत थोडे थोडे जीवन जल पिणे पसंत केलं आणि त्यानुसार दीर्घकाळ जीवन जगण्याचा प्रयत्न करीत गेला. पण एकेदिवशी त्याच्यातील लालची माणसाने त्याच्या संयमावर मात केली आणि त्याच्या मनात सर्व जल पिवून अमर होण्याचा विचार आला. त्याने तो अंमलात आणला आणि त्याचबरोबर यमदूतानी सांगितलेले पण खरे झाले. राजाचे मरण त्याचवेळी आले.
तात्पर्य - लोभाचा अंत कष्ट,संकट, विफलतेशी असतो. त्यामुळे मनावर संयम असणे हेच चांगले असते.
30] राजा जनक आणि ऋषी अष्टावक्र
राजा जनक राजा असूनही त्यांना राजवैभवात आसक्ती नव्हती. लोभ मोहापासून ते सदैव दूर राहात. विनम्रता त्यांच्या स्वभावात होती. त्यामुळे ते आपले दोष दूर करण्याचा प्रयत्न करत असत. आत्मशोध घेण्याचा त्यांचा सदैव प्रयत्न सुरुच असे.
एकदा ते नदीकाठावर एकांतात बसून ‘सोऽहम’ चा जप करत होते. मोठ्या आवाजात त्यांचा जप सुरु होता. तेवढ्यात तेथून अष्टावक्र ऋषि चालले होते. ते परमज्ञानी असल्याने त्यांना राजा जनकाचा जप ऐकून ते जागेवरच थांबले व एका हातात छडी घेऊन थोडे दूर अंतरावर उभे राहिले. मग मोठ्या आवाजात तेही बोलू लागले,’’माझ्या हातात कमंडलू आहे आणि माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनकाच्या कानात ऋषींच्या बोलण्याचा आवाज गेला पण त्याने आपला जप सुरुच ठेवला. अष्टावक्रही ही गोष्ट जोरजोरात बोलत राहिले. शेवटी जनकाने जप थांबवून विचारले,’’मुनिवर, हे तुम्ही मोठमोठ्याने काय सांगत आहात’’ अष्टावक्र जनकाकडे पाहून हसले आणि म्हणाले,’’माझ्या हातात पाण्याचा कमंडलू आहे, माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनक आश्चर्यात पडला व विचारू लागला,’’ महाराज अहो हे तर मलाही दिसत आहे की तुमच्याजवळ छडी आणि कमंडलू आहे पण हे दिसत असतानासुद्धा तुम्ही मोठ्याने ओरडून का सांगत आहात.’’ तेव्हा अष्टावक्रांनी जनक राजांना समजाविले,’’ राजन, माझ्याजवळ असणारा कमंडलू आणि छडी दिसत असतानासुद्धा ओरडून सांगणे हे जसे मूर्खपणाचे आहे तसेच तुमचे सोऽहम उंच आवाजात म्हणणे आहे. मंत्राला घोकण्याने काहीच फळ मिळत नाही. मंत्र आत्मसात करणे किंवा त्याला आतल्या चेतनेशी जोडल्यावरच त्याचे फळ मिळते.’’
तात्पर्य :- कोणतेही ज्ञान घोकंपट्टी करून मिळवण्यापेक्षा ते आत्मसात करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. कोरडे पाठांतर काहीच कामाचे नसते.
31] लोभाची शिक्षा
एक ब्राह्मण यजमानाकडे पूजाअर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने देशात दुष्काळ पडला. त्यामुळे ब्राह्मणाला रोजच्या जेवणाची भ्रांत पडली, यापेक्षा मरण पत्करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला. तेथे वाघाला पाहिले. ब्राह्मणाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्ले तर तर त्याची भूक भागेल व माझीही मृत्यूची इच्छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला. वाघ मनुष्यवाणीत बोलू लागला,''तू असा माझ्यासमोर का उभा आहेस'' ब्राह्मणाने आपली कर्मकहाणी त्याला सांगितली. तेव्हा वाघाला त्याची दया आली. तो प्रत्यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती. वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्याला एक हजार सुवर्णमुद्रा व धान्य दिले व भविष्यात कधीही आत्महत्येचा विचार करू नकोस असे बजावून त्याला परत पाठविले. ब्राह्मण अत्यानंदाने घरी परतला. दुस-या दिवशी एक सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्यासाठी गेला तेव्हा दुकानदाराने या सुवर्णमुद्रा तुला कोठे मिळाल्या असे विचारले असता भाबडेपणाने ब्राह्मणाने खरेखरे सर्व सांगून टाकले. लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले. त्यानेही तसेच वागण्याचे ठरविले. दुस-याच दिवशी त्याने जंगलात जाऊन त्याच ठिकाणी ठिय्या मांडला. वाघ त्याच्यासमोर प्रगटला. त्याला व्यापा-याने खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला तत्काळ समजले, हा खोटे बोलत आहे, त्याने त्याच्यावर हल्ला चढवला आणि जखमी व्यापा-याला सुनावले, आज तुला जिवंत सोडत आहे ज्यायोगे तू असे धाडस पुन्हा करणार नाहीस
तात्पर्य – लोभाने माणसाच्या जीवावरही बेतू शकते, लोभ माणसाचे नुकसान करतो. लोभ टाळणे आवश्यक आहे.
32] विद्या विनयेन शोभते
राजा ज्ञानसेनच्या दरबारात दररोज शास्त्रार्थ केला जात असे. विद्वान लोक तेथे शास्त्रासंबंधी चर्चा करण्यासाठी येत असत. जे विद्वान लोक शास्त्रात पारंगत किंवा वादविवादात जिंकत असत ते विजयी म्हणून घोषित केले जात असत त्यांना राजा धन आणि मान देऊन सन्मानित करत असे. एक दिवस राजा ज्ञानसेनाच्या दरबारात असाच शास्त्रार्थ चालला होता. त्या सभेत पंडित भारवी याला विजयी घोषित करण्यात आले. राजाने त्याचा भरसभेत सत्कार केला व मान देण्यासाठी त्याची हत्तीवरून मिरवणूक काढली. त्याच्या विद्वत्तेच्या सन्मानार्थ राजा स्वत: त्याला चव-या ढाळत त्याला घरापर्यंत सोडण्यास आला. भारवी एवढ्या मोठ्या सन्मानाने घरी आला हे पाहून भारवीच्या आईवडीलांना आकाश ठेंगणे झाले.
घरी आल्याबरोबर भारवीने मातेला साष्टांग नमस्कार केला पण पित्याला मात्र उपेक्षेने उभ्याउभ्याच नमस्कार केला. त्याच्या वर्तनात हे साफ दिसून येत होते की जणू काही पित्याला हे सुचवित होता बघा माझा किती सन्मान झाला आहे, माझ्या ज्ञानाला किती किंमत मिळते आहे, स्वत: राजा हत्तीवर चव-या ढाळत मला सोडायला घरी आला आहे. पित्याने त्याच्या त्याही नमस्काराचा स्वीकार केला आणि त्याला चिरंजीवी भव असे म्हटले. गोष्ट इथेच संपली असे नाही. मात्यापित्यांला हे भारवीचे वागणे खटकले. ते दोघेही उदास राहू लागले. भारवीच्या यशाने ते जेवढे आनंदी राहायला पाहिजे होते तितके ते आनंदी नव्हते. याचे कारणही स्पष्ट होते की भारवीला यश पचविता आले नव्हते व तो ते आईवडीलांना दर्शवित होता. तो यशाच्या धुंदीत शिष्टाचार आणि विनम्रतेला विसरून गेला होता. थोड्या दिवसांनी माता आणि पित्याला उदास पाहून भारवीने मातेला याचे कारण विचारले असता माता म्हणाली,’’ तू विजयी होऊन आलास हे ठीक आहे, पण तू विजयी होण्यासाठी तुझ्या वडीलांनी घेतलेले परिश्रम तू विसरलास. तू शास्त्रार्थ करायला जाणार होतास त्याआधी दहा दिवस तुझ्यासाठी निर्जळी उपवास केले होते व त्या काळात ते परमेश्वराकडे एकच मागणे मागत होते माझ्या मुलाला यश मिळवून दे. लहानपणापासून केवळ तुझ्या यशासाठी त्यांनी कितीतरी स्वत:च्या इच्छा दाबून ठेवल्या व तुला शास्त्रपंडीत बनविले आणि केवळ एकाच यशाने उन्मत्त होऊन तू त्यांची उपेक्षा केलीस हेच आम्हा दोघांच्या खिन्नतेचे कारण आहे.’’ हे ऐकताच भारवीला आपली चूक समजली त्याने मातापित्याच्या चरणावर अक्षरश: लोळण घेतली. अनेकवेळा क्षमायाचना केली व आयुष्यात पुन्हा कधीही त्याने मातापित्यांची सेवा करण्यात कसूर केली नाही.
तात्पर्य :- आयुष्यात आपल्याला कितीही मोठी यशाची शिखरे पादाक्रांत करण्यास मिळाली तरी त्यापाठीमागे आपल्या आईवडीलांची पुण्याई असते हे प्रत्येकानेच समजून घेतले पाहिजे. यश कितीही मिळाले तरी उन्मत्त होऊ नये कारण विद्या ही नेहमी विनय असणा-यांकडेच शोभून दिसते.
33] विवेक आणि उपकार
मुल्ला नसिरुद्दीन रात्री जंगलातून जात होते. अचानक गूढ आवाज त्यांच्या कानी पडला. हा भूताखेताचा प्रकार असावा असे वाटून ते घाबरले. त्यांनी हळूच मागे पाहिले तर गुहेत बसलेला एक मनुष्य त्यांना दिसला, मुल्लांनी विचारले ,"कोण आहेस तू?" तो म्हणाला," मी एक फकीर आहे. इथे बसून साधना करतोय." घाबरलेल्या मुल्लांनी रात्र गुहेत घालविण्यासाठी फकिराकडे परवानगी मागितली व ती त्यांनी दिली. थोड्या वेळाने मुल्लांनी फकिराकडे पिण्यासाठी पाणी मागितले, फकिराने एक भांडे देवून नदीवरून पाणी आणण्यास सांगितले. मुल्ला म्हणाले,"मी खूप घाबरलोय! " तेंव्हा फकिराने स्वतः पाणी आणण्यास जातो म्हणाला.
तर मुल्ला पुन्हा म्हणाले,"तुम्ही गेल्यावर मला येथे भीती वाटेल." हे ऐकताच फकिराने कट्यार काढून दिली. फकीर पाणी घेवून परतला तर मुल्ला मोठ्यानी ओरडू लागले,"खबरदार! जर पुढे आलास तर मारून टाकीन !" फकिराने आपली ओळख सांगितली. तर मुल्ला म्हणाला,"कशावरून तू भूत पिशाच्च नाहीस !फकिराचे रूप घेवून भूत पिशाच्च येवू शकते." वैतागून फकीर म्हणाला,"अरे मीच तुला माझ्या गुहेत आश्रय दिला आणि मलाच तू आत येवू देत नाहीस. असली कसली रे बाबा तुझी भीती !" मुल्लाने काही त्या फकिराला रात्रभर गुहेत येऊ दिले नाही. फकीर बिचारा रात्रभर गुहेबाहेर थांबला. सकाळी मुल्ला उठले व जाऊ लागले. जाताना फकिराला म्हणाले,"भाई ! मला माफ करा ! पण भीती अनेकदा माणसाला विवेक सोडायला भाग पाडते. त्यावेळी तो उपकारकर्त्यालासुद्धा विसरतो."
तात्पर्य- भीतीमुळे माणूस काही वेळेला विवेक गमावतो आणि उपकारकर्त्याला विसरतो, त्याचे उपकार विसरून जातो.
34] शिकवण
एका गावात हिरामण आणि नारायण या नावाचे दोन शेतकरी राहत होते. दोघेही चांगले मित्र होते. हिरामण मोठ्या शेतजमिनीचा मालक होता तर नारायणाजवळ थोडी जमीन होती. पण नारायण त्यात संतुष्ट होता. एकेदिवशी नारायण हिरामणकडे गेला तेंव्हा हिरामण खूपच त्रस्त झालेला त्याला दिसत होता. त्याच्या संपूर्ण घरात वास येत होता आणि घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून येत होते. नारायणने हिरामणला त्याच्या अडचणीचे कारण विचारले, तेंव्हा म्हणाला, समजत नाही कि माझी शेती नष्ट का होत आहे? गरजेपुरते धान्यही पिकत नाही. असेच जर चालत राहिले तर काही काळानंतर जगणेही मुश्कील होईल," नारायणने हैराण होवून विचारले, "तुझ्याकडे तर इतकी जमीन आहे. मग तुझे का हाल होत आहेत? तू माझ्या घरी चल. तिथून आपण दोघे एका संताकडे जाऊ, ते तुला योग्य मार्ग दाखवतील." असे म्हणून दोघे नारायणाच्या घरी आले.नारायणाचे घराचे अंगणात येताच हिरामण चमकला, कारण अंगण स्वच्छ झाडून सडा रांगोळी केली होती, जनावरांचे गोठे स्वच्छ दिसत होते.
घरात फारशी सुबत्ता नसतानासुद्धा नीटनेटकेपणे घर आवरले होते. देवाच्या तसबिरींना ताज्या फुलांचे हार घातलेले होते, देवापुढे अगरबत्ती लावलेली होती. घरातील वातावरण शांत होते. हे दोघे येताच नारायणाच्या पत्नीने त्यांचे हसून स्वागत केले. त्यांच्या खाण्याची व्यवस्था केली. खाणे झाल्यावर नारायण व त्याची पत्नी हे दोघे हिरामणला सांगून काही काळ घरातील कामे करण्यात दंग झाले. कामे आटोपताच नारायण हिरामणला म्हणाला,"चल मित्रा ! आता संतांकडे जाऊ." यावर हिरामण उत्तरला,"मित्रा! तुझ्या घरी येऊन माझे डोळे उघडले आहेत. आता मी सुद्धा तुझ्यासारखे वागण्याचा प्रयत्न करेन. संतांकडे जाण्याची गरज आता मला वाटत नाही, तू मला अशी शिकवण तुझ्या वागणुकीतून दिली आहेस. धन्यवाद मित्रा ! चल निघतो मी.माझे घर आवरायला."
तात्पर्य-"हात फिरे तिथे लक्ष्मी वसे" या म्हणीनुसार आचरण केल्यास मन प्रसन्न राहते व यश प्राप्तीचा मार्ग दिसतो./ आत्मनिर्भरता(स्वावलंबन) हि यशाची गुरुकिल्ली आहे.
35] शिकारी आणि कबूतर
एका गावात एक दुष्ट शिकारी राहत होता. तो दररोज जंगलात जावून पशु पक्षांची शिकार करत असे. एकेदिवशी त्याचा जाळ्यात एक कबुतर मादी अडकली, तो तिला मारून खाऊ इच्छित होता. परंतु अचानक पाऊस सुरु झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी तो एका झाडाखाली थांबला. संयोगाने त्याच झाडाला असलेल्या बिळात हे कबुतर राहत होते. ज्या कबुतर मादीला पकडले होते तिचा पती पत्नीच्या वियोगाने दु:खी होता. कबुतर मादीने आपल्या पतीला दुखात असलेले पाहिले, ती भावनावश झाली ती कबुतराला म्हणाली," मला या शिकाऱ्याने पकडले आहे, परंतु या वेळी तो आपला अतिथी आहे. तू माझी चिंता सोडून शिकाऱ्याकडे लक्ष दे. शिकारी थंडीत कुडकुडत आहे." कबुतराने झाडाची सुकलेली पाने आणि बारीक फांद्या एकत्र करून शिकाऱ्याजवळ शेकोटी पेटवली.
त्यामुळे त्याला ऊब मिळाली, शिकाऱ्याला श्रमामुळे भूकही लागली होती. कबुतराने शिकाऱ्याची भूक भागविण्यासाठी त्या आगीत उडी घेतली. कबुतर मादी आपल्या पतीच्या मृत्यूने दु:खी झाली. हे सर्व पाहून शिकाऱ्याच्या मनात अपराधीपणाची भावना वाढीस लागली. ज्या पक्षांना तो मारून खात होता त्यापैकी एकाने त्याच्यासाठी आपला जीव अग्नीच्या स्वाधीन केला होता व शिकाऱ्यावर उपकार केले होते. हे उपकार फेडण्यासाठी त्याने कबुतर मादीला मुक्त केले. पण कबुतर मादीने पतीच्या आठवणीने व्याकूळ होवून आगीत उडी घेतली. शिकाऱ्याजवळ पश्चाताप करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. त्याच्या मूर्खपणाने दोन जीवांचा संसार उध्वस्त झाला होता.
तात्पर्य - माणसाची सुस्त चेतना जागृत करण्याची आज गरज आहे. ज्यामुळे निसर्गाचे नुकसान टाळता येवू शकते.
36] संत फरीद आणि व्यापारी
एका व्यापाऱ्याला वाईट सवयी होत्या. त्याला या सवयींपासून सुटका करून घ्यावयाची होती. मात्र अनेक प्रयत्नानंतरही तसे होवू शकले नाही. त्याला कुणीतरी संत फरीद यांचे नाव सुचविले, तो तत्काळ त्यांच्याकडे गेला. आणि आपल्याविषयीची सर्व माहिती सांगून विचारू लागला, "माझ्या वाईट सवयी कशा सुटतील?" संतानी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तरी तो व्यापारी हट्टाला पोहोचला. त्याने रोजच येवून संताना विचारणे चालू केले. संत फरीद यांनीही त्याला रोजच टाळले. एके दिवशी व्यापारी अटटहासाला पेटला तेंव्हा फरीद म्हणाले,"मी तुला काय मार्ग दाखवू? तुझे जीवन आता ४० दिवसांचे उरले आहे. इतक्या कमी दिवसात तू कसा सुधारशील? तुझ्या वाईट सवयी कशा काय सुटतील?" हे ऐकताच व्यापारी तणावात आला. त्यानंतर त्याच्या वागण्यात फरक पडू लागला. इतके दिवस केलेल्या वाईट कर्मांची त्याला लाज वाटू लागली, सारखा पश्चाताप करू लागला.
संत सहवासात राहणे, भजन पूजन करणे, सात्विक खाणे पिणे, शुद्ध आचरण करणे इत्यादी क्रिया तो करू लागला. शेवटी ४० वा दिवस उजाडला, व्यापारी मरणाची वाट पाहत होता. अचानक त्याला संत फरीद यांनी बोलावले व सांगितले," मुला, या ३९ दिवसांचा विचार करता तूच मला सांग कि या ३९ दिवसात तू किती वेळेला दुष्टपणे वागला, खोटे बोलला, वाईट कर्म केले?" व्यापारी म्हणाला," हे जे तुम्ही म्हणता ते एकदाही केले नाही. पण त्याचा माझ्या मरणाशी काय संबंध?" संत म्हणाले, " यालाच मरणाची भीती म्हणतात, कि रोजचा दिवस हाच जर आयुष्याचा शेवटचा दिवस म्हणून घालविला तर वाईट कृत्ये माणसाकडून होत नाहीत. माणसाने असे काम केले पाहिजे कि त्याच्या मागेसुद्धा त्याचे नाव निघाले पाहिजे." यानंतर व्यापारी सुधारला व त्याच्यातील वाईट सवयी निघून गेल्या. त्याच्यातील चांगल्या गुणांना संतानी वेगळ्या पद्धतीने जागृत केले.
तात्पर्य- मानवी जीवनाचा भरवसा नाही. तेंव्हा आता मिळालेल्या क्षणातुनच सदवर्तन आणि सत्कर्म केले जावू शकते.
37] संत रज्जब आणि जुबेर
संत रज्जब नेहमीच सर्वोच्च शक्तीच्या स्मरणात मग्न राहत असत. ना कधी वाईट वागत न वाईट विचार करत. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकास ते समान वागणूक देत, सदाचरणाबद्दल सांगत, प्रेमळ व गोड वाणीने बोलत. रज्जब आपल्या गावातील लोकांचे श्रद्धाकेंद्र बनले होते. गावातील लोक त्यांचे विचार ऐकत असत आणि व्यवहारात आचरण करत असत. एकेदिवशी परगावचा जुबेर नावाचा एक तरुण त्या गावात कामाच्या शोधात आला होता. त्याला काम तर मिळाले परंतु पैसा हाती येताच तो दारूच्या आहारी गेला. दारू पिऊन तो लोकांना शिव्या देत असे. यामुळे एके दिवशी त्याने दारू पिऊन खूप हंगामा केला, लोकांना खूप काही बोलला आणि तोल ना सावरता आल्याने तो गटारीत जावून पडला. लोकांना वाईटसाईट बोलल्याने त्याला कुणी गटारीतून काढण्यास पुढे आले नाही.
त्याचवेळी रज्जब तिथे आले. त्यांनी त्याला उचलले, त्याचे तोंड धुतले आणि जुबेरला म्हणाले,"अरे मित्रा! ज्या तोंडातून तू देवाचे नाव घेतले पाहिजे त्या तोंडातून दारू पितो आणि त्याच तोंडातून ईश्वर स्वरूप असलेल्या अनेक माणसाना शिव्या देतो हे चांगले नाही. हा माणुसकीचा सर्वात मोठा गुन्हा आहे. पण हे कळण्यासाठी जुबेर कुठे शुद्धीत होता. त्याला हे सर्व इतर लोकांनी सांगितले तेंव्हा तो स्वत:बद्दल जास्त वाईट वाटले. लोकांनी त्याला संतांनी केलेल्या सहकार्याची जाणीव करून दिली. या गोष्टीचा जुबेरवर खूप परिणाम झाला. त्याने संकल्प केला कि ज्या तोंडाला संतानी धुतले त्या तोंडातून आयुष्यात कधीच वाईट शब्द निघणार नाहीत. त्याने सात्विक जीवनमार्ग पत्करला.
तात्पर्य-संतांचे मार्गदर्शन नेहमीच चांगले असते, फक्त त्यानुसार आचरण करणे हे आपल्या हातात आहे. चांगले आचरण हि माणसाची ओळख आहे.
38] संत राबिया आणि चोर
संत राबियाची ईश्वरभक्ती प्रसिद्ध आहे. ती मनोभावे ईश्वराचे स्मरण करत असे. प्राणीमात्रांना ईश्वरनिर्मिती मानून त्यांची सेवा करत असे. एका रात्री ती निद्रिस्त असताना तिच्या घरात चोर घुसला. त्याला राबियाच्या घरी धन तर सापडणार नव्हते. त्याने खूप शोधाशोध केली. पण हाती काहीच लागले नाही. त्याने समोर पडलेली चादर उचचलली. चादर घेऊन तो जात असताना त्याला एकाएकी चक्कर आली, डोळ्यांना अंधारी आली, काही दिसेनासे झाले, त्याने डोळे चोळून पाहण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच फायदा झाला नाही.
त्याने तेथेच बैठक मारली आणि चादर बाजूला ठेवून डोक्याला थोपटून पाहिले. तेव्हा त्याला बरे वाटले. चादर उचलून तो चालू लागला की तेव्हा पुन्हा त्याची तीच अवस्थ झाली. चादर खाली ठेवली की त्याला बरे वाटत असे. तो हैराण झाला. तेव्हा त्याला कोणीतरी म्हटल्याचा भास झाला,’’ तू स्वत:ला का अडचणीत टाकतो आहेस, राबियाने स्वत:चे अस्तित्व माझ्याकडे सोपवून दिले आहे. जेव्हा एक मित्र झोपतो तेव्हा दुसरा जागा असतो. मग त्याची कोणतीही वस्तू चोरीला जात असताना मी शांत कसा बसेन’’ चोराने तेथे निद्रिस्त असलेल्या राबियाचे चरणस्पर्श करून दर्शन घेतले व तिची चादर तेथेच टाकून तो निघून गेला.
तात्पर्य :-ईश्वराशी आपण एकरूप झालो की ईश्वरही आपली मनापासून काळजी करतो.
39] सवय
एका माणसाने त्याच्या घरी एक पोपट पाळला होता. पिंज-यात ठेवलेल्या पोपटाला चांगले खायलाप्यायला मिळत असे व पोपट बोलका असल्याने घरातील लोकांकडून त्याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्य दाटून येई. अखेर एकेदिवशी पोपटाला संधी चालून आली. त्या माणसाने पोपटाला खाणे देण्यासाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्याच्याहातून ते तसेच उघडे राहिले होते. माणसाला अचानक काही काम आल्याने तो ते दार उघडे टाकून निघून गेला असता
पोपट पिंज-याच्या बाहेर निघून गेला. पण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्याने त्याला फारसे नीट उडताच येत नव्हते. एका झाडावर गेला असता त्याला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्याने त्याला पोपटांची भाषा येत नव्हती म्हणून इतर पोपटही त्याला सहकारी मानत नव्हते. पिंज-यात आयते खायची सवय असल्याने त्याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्याने तो आजारी पडला व मरून गेला.
तात्पर्य : - जास्त काळ पारतंत्र्यात(गुलामगिरीत) राहिल्याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते. मग परक्याची भाषा, संस्कृतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्या साठीची जिद्द अंगी राहत नाही. परक्या संस्कृतीचे चांगले काही घेताना आपल्या संस्कृतीचे विस्मरण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा.
40] सवावलंबन
एक माणूस कामासाठी दुस-या शहरात गेला. प्रवासात त्याची काही लोकांशी ओळख झाली. तेही कामानिमित्ताने त्याच शहरात चालले होते. त्यांच्यापैकी काहीजण पायी तर काही घोड्यावर स्वार होते. बोलत चालले असताना एका घोडेस्वाराच्या हातून चाबूक खाली पडला. त्या व्यक्तिने त्या घोडेस्वारास खाली उतरू न देता, चाबूक देण्याची तयारी दर्शविली पण त्या सहका-यास नम्रपणे नकार देत स्वत: खाली उतरून त्या घोडेस्वाराने चाबूक स्वत:च हातात घेतला.
खालून मदत करणा-या व्यक्तिने याचे कारण घोडेस्वारास विचारले असता घोडेस्वार उत्तरला,''आपण ज्यावेळी घोड्यावर बसतो तेव्हा चाबूक आपणच सांभाळावा लागतो. आपण प्रत्येक गोष्टीत स्वयंपूर्ण राहिलो तरच आपल्याला यशाची खात्री आहे असे समजावे.''
तात्पर्य :- कुणावरही विसंबून न राहता स्वावलंबनाचा स्वीकार केल्याने यश मिळतेच.
Best Marathi story & Marathi story with moral for kids
41] साधू आणि यक्ष
एक साधू तपश्चर्येस एका निर्जन स्थळी बसले होते. त्या ठिकाणी एका यक्षाचे वास्तव्य होते. या गोष्टीची साधूला कल्पना नव्हती. ते जेव्हा तेथे पोहोचले तेव्हा निर्जन स्थान पाहून त्यांनी तेथेच ध्यानधारणा सुरु केली. त्या वेळी यक्ष तेथे नव्हता. रात्री जेव्हा यक्ष तेथे आला तेव्हा आपल्या जागेवर दुस-यास व्यक्तीला पाहून त्याला राग आला. त्याने मोठ्याने आरडाओरड सुरु केली, पण समाधी अवस्थेत असलेल्या साधूवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. यक्षाने मग हत्तीचे रूप घेऊन त्यांना भीती दाखविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते ध्यानस्थ असल्याने त्यांच्यावर याचा काहीच परिणाम झाला नाही.
मग यक्षाने वेगवेगळी रूपे घेऊन साधूला घाबरविण्याचा प्रयत्न केला. कधी तो वाघ, सिंह, तरस, कोल्हा अशा जंगली प्राण्यांची रूपे घेतली तरी साधूच्या ध्यानात काहीच खंड पडेना. शेवटी त्याने विषारी सापाचे रूप धारण करून त्यांना दंश केला तरीही त्यांच्यावर याचा काहीच परिणाम दिसेना. इतक्या प्रयत्नानंतरही साधूवर कोणताही परिणाम न झाल्याने यक्ष झालेल्या श्रमाने थकून सर्परूपातच विश्रांती घेऊ लागला. थोड्याच वेळात साधूंची समाधी अवस्था पूर्ण झाली व ते जागे झाले व त्यांची नजर सर्परूपी यक्षावर पडली. त्या नजरेत इतके प्रेमभाव भरलेले होते की त्या कृपादृष्टीने सापाच्या अंगातील विष अमृत बनले. यक्ष साधूंना शरण गेला व त्याने त्यांना आदरपूर्वक वंदन केले.
तात्पर्य – एकाग्रता, स्नेह आणि प्रेमभावनेने कोणावरही विजय प्राप्त करता येतो.
42] सावकाराचे खोटे
एका शेतकऱ्याच्या पिकांचे खूप नुकसान झाले होते. त्याच्या घरात अन्नाचा कणही शिल्लक नव्हता. गावात त्याला मदत पण करीत नव्हते काय करावे म्हणून शेतकरी विचार करीत राहिला. काहीच उपाय सुचला नाही तेंव्हा त्याने गावातील सावकाराची गाय चोरली. सकाळी त्या गायीचे दुध आपल्या मुलांना पाजले व त्यांची भूक भागविली. सावकाराच्या नोकरांना गाय चोरल्याचे कळल्यावर त्यांनी चोरीची तक्रार केली. सावकाराने पंचायतीमध्ये शेतकऱ्याला बोलावले व विचारले,"हि गाय तू कुठून आणली आहे? " शेतकरी म्हणाला," हि गाय मी खरेदी केली आहे." पंचानी कसून चौकशी केल्यावर सुद्धा शेतकरी त्याच उत्तरावर ठाम राहिला. त्यानंतर पंचानी सावकाराला विचारले, हि गाय खरेच आपली आहे का? सावकाराने क्षणभरच शेतकऱ्याकडे पाहिले आणि शेतकऱ्याने आपली नजर खाली झुकविली, सावकाराने पंचांना सांगितले," हि गाय माझी नाही, माझ्याकडून गायीला ओळखण्यात चूक झाली आहे." पंचानी शेतकऱ्याला दोषमुक्त केले. घरी पोहोचल्यावर सावकाराच्या नोकरांनी सावकाराला खोटे बोलण्याचे कारण विचारले तेंव्हा सावकार म्हणाला,'' ती गाय आपली आहे हे मला व त्या शेतकऱ्याला दोघानाही माहित आहे. पण त्या क्षणी मला शेतकऱ्याचा डोळ्यात विवशता, भुकेची जाणीव आणि केलेल्या चोरीचा पश्चाताप असे एकत्रित भाव दिसले. मी त्याच्यावर आलेल्या संकटाचे गांभीर्य ओळखून खोटे बोललो. मी जर खरे बोललो असतो तर त्याला शिक्षा होवून त्याचे कुटुंब उघड्यावर आले असते त्यापेक्षा मी त्याला खोटे बोलून वाचविले.
तात्पर्य- एखादा संकटात असेल तर त्याला वाचविण्यासाठी आपण प्रत्येक शक्य ते प्रयत्न करणे गरजेचे आहे.
43] सेठ आणि गरीब व्यक्ती
एक धनिक सेठ आपल्या अडचणीतून मुक्त होण्यासाठी दररोज मंदिरात जात असे आणि सोन्याचे ताटात पुजेची सामग्री ईश्वराला समर्पित करत असे. ईश्वर प्रसन्न होईल या आशेने त्याने हे दीर्घकाळ केले. मात्र तसे झाले नाही, एके दिवशी त्याला मंदिरात जीर्ण कपड्यामध्ये एक व्यक्ती दिसली, ती ईश्वराला म्हणत होती,"हे ईश्वरा! तुझे लाख लाख आभार ! मी तुझ्या कृपेने सुखी झोपत आहे माझा कोणी शत्रू नाही आणि मला कसला त्रास नाही. माझ्यावर सदैव अशीच कृपा असू दे." घरी आल्यावर हि सेठला त्या व्यक्तीची गोष्ट आठवत होती कि ईश्वराला दररोज बहुमूल्य उपहार अर्पण करून त्याचे कष्ट कमी होत नव्हते मग तो गरीब ईश्वराला काहीही न देता इतका सुखी कसा? बराच विचार करून सेठ आपल्या दु:खाचे आणि गरीब माणसाच्या सुखाचे कारण शोधण्यासाठी संतांकडे गेला संत त्याची गोष्ट ऐकून म्हणाले, "सेठजी! आपण ज्या प्रमाणे सामान्य माणसाला प्रसन्न करतो त्याप्रमाणे देवाला सुद्धा प्रसन्न करायचे बघत आहात. मात्र गरीब माणसाने आपल्या हृदयात त्या ईश्वराला साठवून ठेवले आहे. तो ईश्वराकडे काही अपेक्षा घेवून जात नाही. तर निरपेक्ष भावनेने देवाचे आभार मानत आहे. ज्यादिवशी आपला ईश्वराबाबतचा भाव बदलेल त्यादिवशी तुला ईश्वराचे दर्शन होईल.
तात्पर्य-ईश्वराशी सदैव नि:स्वार्थी भक्तीभाव असावा; सुख आणि मनशांती निश्चित मिळते
44] हिऱ्यापेक्षा जनता महत्वाची
एक राजा होता. त्याचे सुखी व संपन्न राज्य होते. दुर्दैवाने एकदा त्याच्या राज्यात पाऊसच पडला नाही. त्यामुळे दुष्काळाचे संकट उभे ठाकले. गरिबांचे हाल होऊ लागले. बादशहाने आपला खजिना जनतेसाठी खुला केला. एकेदिवशी तो खजिनाही संपला. आता पुढे काय हा प्रश्न राजासमोर उभा ठाकला. प्रजाजनांचे पोषण कसे करता येईल ही एकच चिंता राजाला सतत सतावित होती. त्याने त्याच्या बोटातली हि-याची अंगठी नोकरांना दिली व सांगितले,'' ही अंगठी घेऊन शेजारच्या देशात जा, तेथील राजाला आपली सर्व परिस्थिती सांगा. तो राजा आपली अवस्था जाणेल व हा हिरा फार दुर्मिळ आहे. या हि-याच्या बदल्यात त्याच्याकडून धान्य मागून आणा व जनतेत वाटप करा. '' मंत्र्यांनी राजाला विचारले,''राजन, इतका महागडा, दुर्मिळ हिरा तुम्ही का विकत आहात, दुसरी काहीतरी सोय करता येईल.'' राजा म्हणाला,''माझे राज्य ही माझी संपत्ती आहे. प्रजा उपाशी मरत असताना मी महागडा हिरा का सांभाळत बसू. प्रजा आहे तर मी आहे. असे हिरे पुन्हा प्राप्त करता येतील पण प्रजा एकदा जर नाराज झाली तर पुन्हा अशी प्रजा मला मिळणार नाही.''
तात्पर्य :- आपल्या हाती जर सत्ता असेल तर त्याचा योग्य विनियोग कसा करता येईल हे पहाणे इष्ट ठरते.
Here I've listed out a few short & best Marathi stories (Marathi story) for kids. This Marathi story article includes various kinds of stories with morals. Please visit our website 'Marathi mug' for further status, Marathi story, Moral based Marathi story, inspiring Marathi story, motivational Marathi story, Marathi Story for kids.
Please visit our website for further status, Marathi story, Moral based Marathi story, inspiring Marathi story, motivational Marathi story, Marathi Story for kids.
Comments
Post a Comment